जळगाव बसस्थानक परिसरातील मोबाईल चोराला अटक; चार मोबाईल जप्त

जळगाव बसस्थानक परिसरातील मोबाईल चोराला अटक; चार मोबाईल जप्त
जळगाव (प्रतिनिधी): नवीन बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगावच्या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या सहाय्याने अटक केली. शेख इम्रान शेख गुफरान (वय २२, रा. गुलशन नगर, मालेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले, तर त्याचा साथीदार सोनू फरार झाला.जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गस्त पथक तयार करण्यात आले होते. यात पोहेकॉ. नरेश सोनवणे, मिलिंद सोनवणे, पोकॉ. राहुल पाटील आणि नरेंद्र दिवेकर यांचा समावेश होता. गस्तीवेळी बसस्थानक परिसरात दोन संशयित दिसले. पोलिसांना पाहताच ते पळाले. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम राबवून शेख इम्रानला प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ताब्यात घेतले.चौकशीत इम्रानने सोनूसह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चार मोबाईल जप्त केले असून, फरार सोनूचा शोध सुरू आहे.