
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तेली गल्ली परिसरात नातेवाईकांकडे आलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी, १० जून रोजी दुपारी १२ वाजेपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर पीडिता ही भडगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी ती नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगाव शहरातील तेली गल्ली परिसरात आली होती. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ती अचानक बेपत्ता झाली. अल्पवयीन असल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
पीडितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरुवारी, १२ जून रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.