
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा ; भावी नगरसेवकांत उत्साहाचे वातावरण
जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, त्यामुळे भावी नगरसेवकांच्या आशा पुन्हा एकदा उजळून निघाल्या आहेत. नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानंतर विविध शहरांमधील प्रभागांचे पुनर्रचनेचे काम सुरू होणार असून, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून तयारीला सुरुवात झाली असून, पोस्टरबाजी, बॅनरबाजी, सोशल मीडियाद्वारे जनसंपर्क मोहीम उभारली जात आहे. आगामी निवडणुका हायटेक प्रचाराच्या युगात विशेष ठरणार असल्याची चर्चा आहे.
विविध राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवली असून, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होईल. मागील काही काळ निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता निवडणुकांचा मार्ग खुला झाल्याने नव्याने ऊर्जा संचारली आहे.
दरम्यान, स्थानिक गटबाजी, मतदारांचे बदलते गणित, आणि पक्षांतर्गत स्पर्धा यांमुळे प्रत्येक इच्छुकासाठी ही निवडणूक एक मोठे आव्हान ठरणार आहे. कोण उमेदवारी मिळवतो, कोण प्रचारात आघाडी घेतो आणि कोण जनतेच्या मनात घर करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.