कार्यकर्त्याच्या निधनामुळे ना. गुलाबराव पाटील यांनी रोखला प्रचार
जळगाव : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी अवघे २०-२२ दिवस शिल्लक असल्याने सर्वच उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचार सुरु केला आहे. सर्वांसाठी एक-एक दिवस नव्हे तर प्रत्येक तास महत्वाचा आहे. अशात एका कार्यकर्त्यांचे निधन झाल्याने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ना.गुलाबराव पाटील यांनी सर्व प्रचार थांबवून मयत कार्यकर्त्यासाठी धाव घेत माणूसकीचा परिचय दिला आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पाळधी येथील रहिवाशी अनिल महाजन (वय ४२) यांचे दि.२८ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. अतिशय शांत व संयमी असलेले तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे संपूर्ण काम पाहणारे तसेच जीपीएस मित्रपरिवाराचे प्रमुख कार्यकर्ते अनिल आत्माराम महाजन यांचे अचानक निधन झाल्याने संपूर्ण पाळधी परिसरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अनिल महाजन हे ना.गुलाबराव पाटील व प्रताप पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात.
ना. गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी त्यांना तत्काळ जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मुंबई येथे रवाना होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना मुंबई येथे नेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांचा माध्यमातून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यांचा रक्तात ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला व अनिल महाजन यांनी धास्ती घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. जीपीएस मित्र परिवाराचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांचा परिवारासह मित्रपरिवार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबावर आघात झाला नाही तर आमच्या कुटुंबावर आघात झाला, अशा भावना ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. यांच्या पार्थिवावर आज अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील, प्रताप पाटील, विक्रम पाटील हे पूर्णवेळ थांबून होते. अगदी कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे ते महाजन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी संवाद साधत होते. ना.गुलाबराव पाटील यांच्या संवेदनशिलपणामुळे त्यांच्यातील एक हळवं व्यक्तीमत्व समोर आलं आहे.