
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट 82 दिवसात पूर्ण
जळगाव परिमंडलात योजनेचे 15557 लाभार्थी
जळगाव प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ 82 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांनी दिली. या योजनेत जळगाव परिमंडलातील जळगाव जिल्ह्यात 9489, धुळे जिल्ह्यात 4187 तर नंदुरबार जिल्ह्यात 1881 असे एकूण 15557 लाभार्थी आहेत.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसात म्हणजे दि. 16 मार्च 2025 पर्यंत विविध विभागांसाठी उद्दीष्टे निश्चित करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची एकूण संख्या दि. 6 डिसेंबर रोजी 71,437 होती व त्यांची एकूण क्षमता 283 मेगावॅट होती. शंभर दिवसांच्या मोहिमेत एकूण घरांची संख्या 1.25 लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. राज्यात दि. 26 फेब्रुवारी रोजी योजनेच्या लाभार्थी घरांची संख्या 1,28,470 व एकूण क्षमता 500 मेगावॅट झाली होती. या योजनेचे शंभर दिवसांचे उद्दीष्ट 82 दिवसात पूर्ण झाले. या आधी महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दीष्ट साठ दिवसात पूर्ण केले आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. योजना सुरू झाल्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत राज्यात 71437 हजार घरांना लाभ झाला होता तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत 82 दिवसात 57,033 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले. योजनेत आतापर्यंत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना एकूण 800 कोटी रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या 21,027 झाली आहे. नागपूरनंतर पुणे (9875 घरे), जळगाव (9489 घरे), छत्रपती संभाजीनगर (8814 घरे), नाशिक (8558 घरे), अमरावती (7179 घरे), कोल्हापूर (6291 घरे), धुळे (4187 घरे) आणि सोलापूर (4007 घरे) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला 30 हजार रुपये, दोन किलोवॅटला 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. जास्तीत जास्त अनुदान 78 हजार रुपये आहे. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मिटर मोफत दिला जातो. छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.