
शाहू नगरातील मुख्य रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे महापालिकेला निवेदन
४० वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था; वाहतूक व पाणीपुरवठावर परिणाम
जळगाव प्रतिनिधी शाहू नगर परिसरातील हनुमान मंदिर ते सुपर प्रोव्हिजन स्टोअरपर्यंतचा मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करत स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. गेल्या ४० वर्षांत रस्त्याचे काम न झाल्यामुळे परिसरातील मार्ग पूर्णतः जीर्णावस्थेत असून पावसाळ्यात रस्ता खड्ड्यांनी भरून वाहतूक कोंडी व हालअपेष्टा वाढल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनात सांगण्यात आले की, हनुमान मंदिर ते सुपर प्रोव्हिजनपर्यंतचा रस्ता हा परिसरातील मुख्य संपर्क मार्ग असून त्यावर मोठी खडी, खोल खड्डे व चोक झालेल्या गटारांचे पाणी जमा होत असल्याने नागरिकांचे येणे-जाणे कठीण झाले आहे. वयस्कर नागरिक, महिला व लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी डेहम-दम पाण्याचे साचलेले ठिकाण वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत.
नागरिकांनी अमृत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न केल्याचा आरोप महापालिकेवर केला. इतर प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असताना शाहू नगर परिसर मात्र अद्याप दुर्लक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
“शाहू नगर हा शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. गोरगरिब जनता मोठ्या संख्येने राहणाऱ्या या भागात रस्त्याच्या समस्येला गांभीर्याने पाहिले जात नाही,” असे नागरिकांनी नमूद केले आहे.
नागरिकांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची, गटारांची सफाई व नवी ड्रेनेज व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये मेहमूद सर, शेख रईस शेखचांद, शेख एनोद्दीन पैलवान, शेख मुस्ताक यूसुफ, शेख समीर शेख चिराग, उमर शेख यासीन, शेख आदिल शेख फारुक, आसिफ शेख अकबर, मुस्ताक शेख (गुड्डू) आणि रेहान शेख यांचा समावेश आहे.




