
पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेचे नियोजन; शहरात १० टक्के पाणी कपातीची तयारी
रोटेशन कायम ठेवत गळती रोखणे, दंडात्मक कारवाई आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर
जळगाव | प्रतिनिधी
यंदा पावसाळा सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आतापासूनच उपाययोजनांची आखणी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात सुमारे १० टक्के कपात करण्याचे नियोजन करण्यात येत असून, नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी विविध पर्यायी उपायांवर भर दिला जात आहे.
पाणीपुरवठ्याचे रोटेशन कायम राहणार
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या दोन दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याचा कोणताही तातडीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून विद्यमान रोटेशन कायम ठेवत पाण्याची बचत करण्यासाठी इतर उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील पाणीगळतीची ठिकाणे शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात येणार आहेत. गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यावर भर दिला जाणार असून, जुन्या व खराब झालेल्या वाहिन्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.
पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
पाणी वाचविण्यासाठी जनजागृतीसोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही नियोजन आहे. नळांना तोट्या बसविणे, विनाकारण पाणी वाहू देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण करणे यावर महापालिकेचा भर राहणार आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहिरींचे पुनरुज्जीवन
शहरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि मोठ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करून भूजल पातळी वाढविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
आरओचे पाणी वाया घालवू नका
अनेक घरांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरओमधून बाहेर पडणारे पाणी कुलर, स्वच्छता किंवा इतर उपयोगासाठी वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे.
पाणी बचतीसाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने पाणी बचतीचे नियोजन सुरू केले असून, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



