जळगाव

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; समस्या ऐकून जागेवरच दिले उपायांचे आदेश

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; समस्या ऐकून जागेवरच दिले उपायांचे आदेश

जामन्या येथील रेशन दुकान निलंबित करण्याच्या सूचना; आरोग्य, रस्ते, रोजगार व दूरसंचार सुविधांचा घेतला आढावा

जळगाव | प्रतिनिधी

प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात आणि त्या तातडीने सोडवाव्यात, या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी यावल तालुक्यातील लंगडाआंबा, जामन्या, गाड्या आणि उसमळी या दुर्गम आदिवासी गावांना भेट देत दोन दिवसांचा मुक्काम केला. ४ आणि ५ जून रोजी झालेल्या या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित विभागांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले.

जनसंवादातून उघड झाल्या समस्या

जामन्या येथील वनविभागाच्या प्रांगणात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात सुमारे १०० ते १२५ ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी रेशन धान्य वितरण, आरोग्य सेवा, रस्ते, रोजगार, घरकूल, सौरऊर्जा, वनहक्क आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांनी विविध प्रश्न मांडले.

रेशन दुकानावर कारवाईचे निर्देश

धान्य वितरणातील त्रुटींबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दुसऱ्याच दिवशी जामन्या येथील स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली. धान्याची गुणवत्ता, वितरण व्यवस्था आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याची तपासणी केल्यानंतर संबंधित दुकान तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या.

आरोग्य उपकेंद्रातील हलगर्जीपणावर नाराजी

जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र सातत्याने बंद राहत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपकेंद्राची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात वास्तव्यास राहून नागरिकांना २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले.

रस्ते आणि दळणवळण सुविधांवर भर

मोहमांडली-माथन-गाड्या मार्गासह हरिपुरा-आंबापाणी-उसमळी-लंगडाआंबा आणि वाघझिरा-लंगडाआंबा रस्त्यांची कामे रखडल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली. यावर संबंधित विभागांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात या भागात मिनी बस सेवा सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

मोबाईल नेटवर्कची प्रत्यक्ष तपासणी

लंगडाआंबा, उसमळी आणि गाड्या-जामन्या येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरची प्रत्यक्ष पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून कॉल करून नेटवर्कची स्थिती तपासली. दुर्गम भागातील दूरसंचार सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रोजगार व वनहक्कांवर विशेष भर

समुदाय वनहक्कांतर्गत मंजूर निधी व विकासकामांचा आढावा घेत रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण कामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच डिंक, चारोळी आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यास दौरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

घरकूल व सौरऊर्जा योजनांवर लक्ष

घरकूल योजनेंतर्गत मंजूर घरकुलांपैकी अत्यल्प कामे पूर्ण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. कुसुम सोलर योजनेतील लाभार्थ्यांना अपूर्ण साहित्य मिळाल्याची बाब समोर आल्यानंतर उर्वरित साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागाला देण्यात आल्या.

पर्यावरण दिनी वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लंगडाआंबा परिसरात सिताफळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच जामन्या येथील आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक सुविधांचाही आढावा घेतला.

प्रशासनाची लोकाभिमुख कार्यपद्धती

ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्थळभेटी, तपासण्या आणि तातडीच्या सूचना देण्यात आल्याने प्रशासनाची लोकाभिमुख आणि संवेदनशील कार्यपद्धती अधोरेखित झाली. या दौऱ्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button