खगोलप्रेमींसाठी पर्वणी; आज सायंकाळी दिसणार ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

खगोलप्रेमींसाठी पर्वणी; आज सायंकाळी दिसणार ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
उघड्या डोळ्यांनी पाहता येणार अद्भुत खगोलीय घटना; अंधश्रद्धा न मानता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन
जळगाव, प्रतिनिधी : खगोलप्रेमींसाठी आजची (९ जून) संध्याकाळ विशेष पर्वणी ठरणार आहे. सूर्यमालेतील दोन तेजस्वी ग्रह ‘शुक्र’ आणि ‘गुरु’ आज एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्याचे दृश्य आकाशात पाहायला मिळणार आहे. खगोलशास्त्रात या घटनेला ‘ग्रहांची युती’ (कंजंक्शन) म्हटले जाते. जळगावसह महाराष्ट्र आणि देशभरातून ही दुर्मिळ खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असल्याची माहिती पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी दिली आहे.
खगोलतज्ज्ञांच्या मते, शुक्र आणि गुरु ग्रह आज अवघ्या १.५ ते १.६ अंश कोणीय अंतरावर दिसतील. सूर्यास्तानंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत पश्चिम क्षितिजावर हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या शेजारी तेजस्वी स्वरूपात चमकताना पाहता येतील. निरीक्षणासाठी सायंकाळी ७.४५ ते ८.१५ ही वेळ सर्वोत्तम मानली जात आहे.
विशेष म्हणजे, जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ‘नॅशनल जिओग्राफिक’ संस्थेने या ग्रहयुतीचे वर्णन ‘कॉस्मिक किस’ (Cosmic Kiss) असे केले आहे. शुक्र ग्रह हिऱ्यासारखा तेजस्वी तर गुरु ग्रह किंचित पिवळसर रंगात चमकत असल्याने हे दृश्य अधिक आकर्षक ठरणार आहे.
दृष्टीभ्रमाचा सुंदर आविष्कार
खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले नसतात. शुक्र पृथ्वीपासून सुमारे १८ कोटी किलोमीटर अंतरावर तर गुरु तब्बल ९० कोटी किलोमीटर अंतरावर असतो. मात्र पृथ्वीवरून पाहताना ते एकाच दृष्टीरेषेत आल्यामुळे एकमेकांच्या अगदी जवळ असल्याचा भास निर्माण होतो.
गुरुचे चार चंद्रही पाहण्याची संधी
साध्या दुर्बिणी किंवा बायनॉक्युलरच्या साहाय्याने निरीक्षण केल्यास गुरु ग्रहाच्या शेजारी त्याचे प्रसिद्ध ‘गॅलिलियन चंद्र’ – आयो, युरोपा, गॅनिमिड आणि कॅलिस्टो हेही लहान प्रकाशबिंदूंप्रमाणे दिसू शकतात. शुक्र ग्रहाला एकही नैसर्गिक उपग्रह नसताना गुरु ग्रहाला सध्या ९५ अधिकृत चंद्र असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
अंधश्रद्धेला बळी पडू नका
जळगावमधील हवामानाचा अंदाज लक्षात घेता, आकाश बहुतांश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना या खगोलीय दृश्याचा आनंद घेता येणार आहे. अशा घटनांचा मानवी जीवन, भविष्य किंवा राशींवर कोणताही परिणाम होत नसून हे केवळ ग्रहांच्या गतीचे आणि खगोलीय भूमितीचे सुंदर उदाहरण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोनातून घराच्या गच्चीवरून किंवा मोकळ्या मैदानातून या दुर्मिळ आणि मनोहारी खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.




