
सोन्याचे आमिष दाखवून सराफाची सव्वा सहा लाखांची फसवणूक
जळगाव : सोन्याचे तुकडे असल्याचे भासवून त्यावर सोन्याची पॉलिश केलेली चांदी देत एका सराफ व्यावसायिकाची तब्बल ६ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील घाणेकर चौक परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खेतमल लुनिया (वय ५५, रा. गणपतीनगर) यांचे सराफ बाजारात सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. २३ जून रोजी त्यांना बऱ्हाणपूर येथील महेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने सोन्याचे दागिने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत व्हॉट्सअॅपवर विविध दागिन्यांचे फोटो मागविले.
फोटो पाहिल्यानंतर संशयिताने दोन चेन पसंत केल्या. त्याची किंमत ६ लाख १९ हजार १०२ रुपये असल्याचे लुनिया यांनी सांगितले. त्यानंतर रोख रक्कम देण्याऐवजी आपल्याकडे असलेले ४९.३५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे देण्याची तयारी संशयिताने दर्शविली.
ठरल्याप्रमाणे राजेश नावाचा त्याचा शालक जळगावातील घाणेकर चौकात आला. तेथे दिलीप लुनिया यांनी ४२.५५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्या ताब्यात दिले. बदल्यात संबंधिताने सोन्याचे तुकडे असल्याचे सांगून काही तुकडे दिले.
मात्र, दुकानात परतल्यानंतर लुनिया यांनी त्या तुकड्यांची तपासणी केली असता त्यांचे वजन कमी भरत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ते तुकडे सोन्याचे नसून चांदीवर सोन्याची पॉलिश केलेली असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी शहर पोलिसांनी महेश वर्मा आणि राजेश नाव सांगणाऱ्या दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



