कृषी संजीवनी योजनांची पारदर्शक अंमलबजावणी करा;विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांचे मेहुणबारे येथील बैठकीत निर्देश

जळगाव मीडिया प्रतिनिधी : मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (NDKSP) अंतर्गत मेहुणबारे ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत प्रकल्पाच्या विविध घटकांची अंमलबजावणी, गावस्तरावरील कृषी विकास आराखडा, शेतकरी लाभार्थ्यांना योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच विविध कृषी योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे, तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड, उपकृषी अधिकारी एस. टी. राठोड, प्रकल्प सहाय्यक अविनाश चंदिले, कृषी सेवक प्रतिक कोंथिंबीरे, समूह सहाय्यक प्रशांत सांळुके, अनंत देवरे, विकी महाजन, श्रीकांत राजपूत, सरपंच रविंद्र साळुंखे, प्रगतशील शेतकरी देविदास महाजन, अविनाश वाघ तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी Agristack व महाविस्तार AI (Mahavistar AI) या उपक्रमांमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या डिजिटल उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ, तांत्रिक मार्गदर्शन व शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असल्याचे सांगत गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर श्री. काटकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत डेस्क-१ ते डेस्क-६ पर्यंतच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. अर्ज नोंदणी, छाननी, प्रस्ताव प्रक्रिया आणि लाभार्थी निवडीच्या कामाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच सर्व योजनांची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीच्या समारोपावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत उपलब्ध विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. गावाच्या शाश्वत कृषी विकासासाठी प्रशासन, ग्रामपंचायत आणि शेतकरी यांनी समन्वयाने कार्य करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.




