गुन्हेजळगावसामाजिक

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

जळगाव,  (प्रतिनिधी) जळगाव सारख्या शहरात गांधीचा शोध घेणारा असा कार्यक्रम अनुभवायला मिळाला हा अपूर्व असा थक्क करणारा अनुभव आहे. असे प्रतिपादन हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष शंकर कुमार सन्याल, सुप्रसिद्ध लेखक सुधेंद्र कुलकर्णी यांनी केले. हरिजन सेवक संघाच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में है दम’ या कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
या संगीतमय कार्यक्रमाने जैन हिल्स येथील कस्तुरबा सभागृहातील रसिकांना दीड तास मंत्रमुग्ध केले. संत कबीरांपासून संत तुकारामांपर्यंतच्या संतपरंपरेचा गांधीविचारांशी साधलेला सुरेल संवाद, गांधीजींच्या जीवनातील ज्ञात-अज्ञात प्रसंग आणि सत्याग्रहाच्या प्रवासाचे प्रभावी निवेदन यामुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि कलात्मक उंची लाभली.

ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या निवेदनातून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगात प्रभावी निवेदन आणि अर्थपूर्ण गीतांची सुरेख गुंफण करण्यात आली. राजकारण, द्वैत-अद्वैत,बुद्ध तत्वज्ञान , जैन तत्वज्ञान , संत नामदेव, संत तुकाराम आणि कबीर, बहिणाबाई यांच्या विचारविश्वाचा गांधीजींच्या जीवनदृष्टीशी साधलेला अनोखा संगम रसिकांसमोर उलगडला. ‘रघुपती राघव राजाराम’, ‘वंदे मातरम्’, ‘भेटी लागे जीवा’, ‘वैष्णव जन तो’, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’, ‘मोको कहा धुंडे रे बंदे, ‘दे दे हमें आज़ादी’, ‘अल्ला तेरो नाम’ आणि ‘ऐसी लागे लगन मीरा हो गयी मगन’ आदी रचनांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या कविता व रचनांनी कार्यक्रमाला सामाजिक आशयाची धार दिली. निवेदनातून शंभू पाटील यांनी गांधीजींचे शिक्षण, दक्षिण आफ्रिकेतील रेल्वेतील अवमानाचा प्रसंग, स्वराज्याची संकल्पना, गांधी-विनोबा विचारांतील एकात्मता तसेच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे कराराचा ऐतिहासिक संदर्भ प्रभावीपणे मांडला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपण अधोरेखित केले . त्यामुळे हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता इतिहास, विचार, तत्वज्ञान आणि संगीत यांचा मनोहारी त्रिवेणी संगम ठरला.

कार्यक्रमातील कलाकार गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणिक-कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, डॉ सोनाली महाजन, अंजली धुमाळ, वरुण नेवे, दर्शन गुजराथी, अक्षय नेहे, अक्षय दुसाने,
रोहित बोरसे, यश महाजन, शुभार्थी कुलकर्णी होते. या कार्यक्रमच दिग्दर्शन नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे यांनी केले आहे, हर्षल पाटील व विशाल कुलकर्णी हे निर्मिती प्रमुख होते. तांत्रिक बाजू राहुल निंबाळकर, मंगेश कुलकर्णी व गणेश सोनार यांनी सांभाळली. सगळ्यांचा डॉ. शंकर सन्याल यांच्या हस्ते सुती हार घालून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रभावी मांडणीचे कौतुक करताना युवकांमध्ये गांधीविचारांची प्रेरणा जागविण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असल्याचे डॉ. सन्याल यांनी सांगितले. ‘बंदे में है दम’ हा कार्यक्रम दिल्ली येथेही सादर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आयोजकांना सस्नेह निमंत्रण दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button