गुन्हेजळगाव

जळगावात स्मशानभूमीजवळ पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; २ जिवंत काडतुसे जप्त

:जळगावात स्मशानभूमीजवळ पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; २ जिवंत काडतुसे जप्त

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई; आरोपी प्रकाश तोलारविरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल

दैनिक दिव्य मराठी / जळगाव : शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात शनीपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपी परिसरात पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रकाश तोलार (वय – रा. खेडी, ता. जळगाव, ह.मु. साई सिटी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई

जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते.

१० ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपी परिसरात एक तरुण संशयास्पदरित्या अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री पटताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि सापळा रचून संशयित प्रकाश तोलार याला जागीच ताब्यात घेतले.

झडती दरम्यान सापडले पिस्तूल

पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ हे घातक शस्त्र जप्त केले असून, याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६ नुसार भारतीय आर्म्स अॅक्ट कलम ३/२५(१-B)(a) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पिस्तूल त्याने कुठून आणले आणि याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या पथकाने बजावली कामगिरी

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पीएसआय नितीन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पराग दुसाने तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button