
जळगाव मीडिया ( वसीम खान ) : शहरात सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना पिंप्राळा घरकुल येथील मनपाच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक सुरेश भाऊ सोनवणे, नगरसेवक जाकीर भाऊ पठाण, नगरसेवक अतुल भाऊ बारी तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण भाई यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रात महिला, लहान मुले तसेच वयोवृद्ध रुग्णांची मोठी गर्दी आढळून आली. अनेक रुग्ण व्हायरल इन्फेक्शनच्या त्रासाने उपचारासाठी आलेले असल्याचे दिसून आले.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असताना आरोग्य केंद्रात आवश्यक कर्मचारीसंख्या अपुरी असल्याचे, तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे पाहणीत निदर्शनास आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
विशेषतः ज्या रुग्णांना सलाईनची आवश्यकता आहे, अशा रुग्णांनाही सलाईन लावण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याचे गंभीर चित्र यावेळी समोर आले. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
“रुग्ण वाढत असताना आरोग्य केंद्र मात्र सुविधांपासून वंचित का?”
व्हायरल इन्फेक्शनची साथ वाढत असताना मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करून औषधांचा पुरेसा साठा, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी, सलाईनची व्यवस्था आणि रुग्णांना आवश्यक प्राथमिक उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
“गोरगरीब नागरिकांसाठी असलेल्या मनपाच्या आरोग्य केंद्रातच जर औषधे आणि आवश्यक उपचार उपलब्ध नसतील, तर सामान्य नागरिकांनी जायचे कुठे? रुग्णांची गैरसोय आणि आरोग्याशी होणारा हा खेळ कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा आक्रमक इशारा नगरसेवकांनी दिला.
मनपा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आरोग्य केंद्रातील त्रुटी दूर कराव्यात आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


