
जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क : अजिंठा चौफुलीजवळील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या भंगार बाजाराचा मुद्दा आता निर्णायक वळणावर आला आहे. भंगार बाजाराची जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगाने सुरू केल्या असून, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईची तयारी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने या कारवाईसाठी पोलिस प्रशासनाकडे मोठ्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे अजिंठा चौफुलीजवळ लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
🔴 प्रशासनाचा थेट अॅक्शन प्लॅन!
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवरील अतिक्रमण आणि वापराबाबत महापालिका प्रशासनाने यापूर्वीच पाहणी केली आहे. नोटीस प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत.
आता प्रशासनाकडून थेट जागा रिकामी करून घेण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे.
👮♂️ कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त
कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. भंगार बाजारातील गाळे सील करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे नियोजन असून, महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
⚠️ अनेक वर्षांचा प्रश्न आता संपणार?
अजिंठा चौफुलीजवळील या जागेचा वापर अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. संबंधित कराराची मुदत संपल्यानंतरही जागेचा वापर सुरू असल्याने प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
त्यामुळे महापालिका प्रत्यक्षात कधी कारवाई करणार? भंगार बाजारातील गाळे कधी सील होणार? आणि जागा पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात कधी येणार? याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.



