जळगावराजकारण

ड्रोनच्या मुद्द्यावरून जळगावच्या राजकारणात सूचक भाष्य; अरविंद देशमुखांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

“ड्रोन शेताची पाहणी करणारा आहे, राजकारणाची नाही!” सूचक शब्दांत मांडली भूमिका

जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क |  जळगावच्या राजकीय वर्तुळात सध्या ड्रोनच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावरील एका पोस्टची चर्चा रंगण्याची शक्यता आहे. जळगावचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी फेसबुकवर केलेल्या सूचक भाष्यामुळे राजकीय चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

“ड्रोन हातात आहे म्हणून घाबरायचं कारण नाही, हा शेताची पाहणी करणारा ड्रोन आहे, राजकारणाची नाही,” अशा शब्दांत अरविंद देशमुख यांनी आपल्या पोस्टमधून भूमिका मांडली आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, काहींना आकाशात उडणारी प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटते; कारण जमीन पायाखालून सरकली की नजर आपोआप वर जाते. आम्ही ड्रोनने शेत पाहतो, पीक पाहतो, विकास पाहतो; मात्र काही मंडळी त्यातही आरोपांचा कॅमेरा शोधतात, अशा आशयाचे भाष्य त्यांनी केले आहे.

“शेतीत तंत्रज्ञान आणणे हा आमचा प्रयत्न आहे आणि अफवांना शांत उत्तर देणे हा जनतेच्या विश्वासाचा भाग आहे,” असेही देशमुख यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी “नेता नव्हे, कार्यकर्ता” असा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ड्रोनच्या वापरावरून सूचक संदेश?

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यासंदर्भातील संशय किंवा आरोप या मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या या पोस्टमुळे विविध चर्चांना वाव मिळाला आहे. देशमुख हे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या पोस्टकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

मात्र, आपल्या पोस्टमध्ये अरविंद देशमुख यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भाष्याचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेला उधाण

ड्रोन, शेती आणि राजकारण यांची सांगड घालत केलेल्या या पोस्टमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. देशमुख यांच्या या सूचक भाष्याचा नेमका अर्थ काय, याबाबत आता सोशल मीडियावर वेगवेगळे अर्थ लावले जाण्याची शक्यता आहे.

ड्रोनच्या उड्डाणासोबतच आता सोशल मीडियावरील या पोस्टचीही चर्चा रंगणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button