जळगाव

भंगार बाजारानंतर आता ट्रान्सपोर्टनगरची बारी!

शंभर ते सव्वाशे दुकानदारांना जागा रिकामी करण्याचे निर्देश; नोटिसा आणि सुनावणीनंतरही दुकाने कायम, महापालिकेच्या संभाव्य कारवाईने खळबळ

भंगार बाजारानंतर आता ट्रान्सपोर्टनगरची बारी!

शंभर ते सव्वाशे दुकानदारांना जागा रिकामी करण्याचे निर्देश; नोटिसा आणि सुनावणीनंतरही दुकाने कायम, महापालिकेच्या संभाव्य कारवाईने खळबळ

जळगाव, प्रतिनिधी : अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजारातील ११७ अनधिकृत दुकाने हटविल्यानंतर आता जळगाव महापालिकेने ट्रान्सपोर्टनगरमधील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सुमारे शंभर ते सव्वाशे दुकानांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या असून, सुनावणीनंतर जागा रिकामी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप दुकाने हटविण्यात आलेली नसल्याने या परिसरातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजारात ३० सप्टेंबर रोजी महापालिकेने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या कारवाईत महापालिकेच्या जागेवर सुरू असलेली ११७ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह महापालिका आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि उपायुक्त पंकज गोसावी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांमध्येही खळबळ उडाली होती.

नोटिसा, सुनावणी; तरीही दुकाने कायम

ट्रान्सपोर्टनगर परिसरात ट्रान्सपोर्ट चालक-मालकांची सुमारे शंभर ते सव्वाशे दुकाने आहेत. ही दुकाने महापालिकेच्या मालकीच्या जागेवर असल्याने प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर सुनावणी घेऊन जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, या निर्देशांनंतरही दुकाने कायम असल्याने प्रशासनाकडून पुढील कारवाईची तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. भंगार बाजाराप्रमाणेच ट्रान्सपोर्टनगरमध्येही अचानक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्यता असल्याने दुकानदारांचे लक्ष महापालिकेच्या हालचालींकडे लागले आहे.

शिरसोली रोडही महापालिकेच्या रडारवर

ट्रान्सपोर्टनगरपुरतीच ही मोहीम मर्यादित राहणार नसल्याचे संकेत आहेत. शिरसोली रोड परिसरातील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचीही प्रशासनाकडून तयारी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय शहरातील खुल्या भूखंडांवर अतिक्रमण करून जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. भंगार बाजारातील मोहिमेनंतर आता ट्रान्सपोर्टनगर आणि शिरसोली रोड परिसरात प्रशासन कोणती भूमिका घेते, तसेच कारवाईचे स्वरूप काय असते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button