जळगाव महानगरपालिकेला लाभले नवीन आयुक्त ;ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली;
महावितरण'मधून थेट २०२१ बॅचचे तरुण आयएएस अधिकारी आदित्य जिवने यांची नियुक्ती

जळगाव महानगरपालिकेला लाभले नवीन आयुक्त ;ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली;
‘महावितरण’मधून थेट २०२१ बॅचचे तरुण आयएएस अधिकारी आदित्य जिवने यांची नियुक्ती
ढेरे यांच्या आगामी पदाबाबत सस्पेन्स कायम; राज्यातील आणखी तीन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या!
जळगाव: प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून जळगाव राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या आयुक्त बदलीच्या चर्चांवर अखेर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी २०२१ बॅचचे तरुण व डॅशिंग आयएएस (IAS) अधिकारी आदित्य जिवने यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी (दि. ९ जून २०२६) भारतीय प्रशासकीय सेवेतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या नव्या फेरबदलामुळे जळगाव मनपाच्या कारभाराला आता एक नवीन दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चर्चांना पूर्णविराम; संभाजीनगरहून जिवने जळगावात दाखल होणार
जळगाव मनपाचे मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या बदलीबाबत गेल्या काही काळापासून तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर मंगळवारी राज्य शासनाने आदेश काढत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. जळगावचे नवे आयुक्त आदित्य जिवाने हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर) म्हणून अत्यंत प्रभावीपणे कार्यरत होते. महावितरणमधील त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि कामाचा वेग पाहता, आता जळगाव शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
आयुक्त ढेरे यांच्या आगामी नियुक्तीबाबत अद्याप गूढ!
दुसरीकडे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची जळगावातून बदली निश्चित झाली असली तरी, त्यांची पुढील रवानगी नेमकी कोणत्या विभागात किंवा शहरात करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत आदेशात स्पष्टता करण्यात आलेली नाही. या संदर्भात थेट ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला बदलीचे वृत्त समजले असून त्याला दुजोरा दिला आहे; मात्र पुढील नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रशासनाला प्राप्त व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ढेरे यांच्या आगामी पदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
प्रशासकीय वर्तुळात खांदेपालट; आणखी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य शासनाने जळगावसह राज्यातील अन्य तीन महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही एकाच वेळी जारी केले आहेत. यामध्ये नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे (आयएएस, २००७ बॅच) यांची मुंबई मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी बढती करण्यात आली आहे. तसेच, सुनील महिंद्रकर (आयएएस, २०१५ बॅच) यांची मुंबईत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून नवीन नियुक्ती झाली आहे, तर अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम (आयएएस, २०१५ बॅच) यांची नागपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आयुक्त या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे.
नवे तरुण नेतृत्व; जळगावच्या विकासकामांना मिळणार ‘बूस्टर डोस’
नवनियुक्त आयुक्त आदित्य जिवाने हे २०२१ बॅचचे अत्यंत ऊर्जावान आयएएस अधिकारी असल्याने जळगावकरांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जळगाव शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, अमृत पाणीपुरवठा योजना, स्वच्छता आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवर ते आपल्या प्रशासकीय कौशल्याने कशी मात करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरुण आणि गतिमान नेतृत्व लाभल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल होऊन शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम अधिक वेगाने मार्गी लागेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.


