
जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला ; संशयीताला अटक
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तांबापूरा परिसरात जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला मेहरुण परिसरातील बागेतून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शाहिद शहा सद्दाम शहा (वय १९, रा. टिपू सुलतान चौक, तांबापूरा) हा तरुण मंगळवारी रात्री आपल्या मित्रांसोबत फिरदोस डेअरीजवळील चौकात उभा असताना, फारुख शेख सलीम (रा. तांबापूरा) याने अचानक तेथे येत शाहिदवर धारदार शस्त्राने हल्ला केला. ‘‘माझ्या वाटेला आलास, तर जिवंत ठेवणार नाही,’’ असे म्हणत त्याने थेट गळ्यावर वार केला.
हल्ल्यानंतर शाहिद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तत्काळ रिक्षाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करत तब्बल ४५ टाके घेतले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी शुद्धीवर आल्यावर त्याचा जबाब घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर संशयित फारुख शेख घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाना तायडे, नितीन ठाकूर, किरण पाटील व राहुल घेटे यांच्या पथकाने शोध मोहीम राबवली. अखेर मेहरुणच्या बागेत लपून बसलेला फारुख शेख सापडून त्याला अटक करण्यात आली आहे.