जळगाव शहरात कायदा-सुव्यवस्थेचा ‘बोजवारा’: बंद पोलीस चौक्यांचा गुन्हेगारांना ‘अप्रत्यक्ष पाठिंबा’?
अवैध धंद्यांचा विळखा आणि रामभरोसे वाहतूक; नागरिक भीती अन् त्रासाच्या छायेत

जळगाव मीडिया / वसीम खान): जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कमालीची बिघडली असून वाढत्या चोऱ्या, उघड माथ्याने चालणारे अवैध धंदे आणि विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे सामान्य नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक भागांतील बंद पडलेल्या पोलीस चौक्यांमुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, पोलीस प्रशासनाच्या सुस्त कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गुन्हेगारांचे ‘केंद्र’ बनल्या बंद पोलीस चौक्या!
शहरातील महत्त्वाच्या चौक आणि संवेदनशील भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांवर आज टाळे लागल्याचे चित्र आहे. या बंद चौक्यांचा थेट फायदा गुन्हेगार आणि टवाळखोर उचलत आहेत. चौक्यांमध्ये पोलीसच नसल्याने भुरट्या चोऱ्या, घरफोड्या आणि महिलांची छेडछाड करणाऱ्यांचे फावले आहे.
अवैध धंदे खुलेआम; पोलीस प्रशासन गप्प का?
शहरातील गल्लीबोळात दारूची बेकायदेशीर विक्री, गांजा, बंदी असलेला गुटखा, पत्त्यांचे क्लब, सट्टा-मटका आणि कुंटणखाने उघडपणे सुरू आहेत. लहान मुले व तरुण पिढी या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढली जात आहे. हे सर्व प्रकार पोलिसांच्या नाकाखाली सुरू असतानाही ठोस कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वाहतूक व्यवस्था रामभरोसे, फक्त महामार्गावरच पोलीस?
शहरातील अंतर्गत वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक प्रमुख सिग्नल्सवर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी फिरकतही नाहीत. त्यामुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीत वाहनधारकांना तासन्तास अडकून राहावे लागते. सिग्नल व्यवस्था नक्की कोणाच्या भरवशावर सुरू आहे, असा प्रश्न पडतो. वाहतूक पोलीस केवळ महामार्गावर किंवा वसुलीपुरतेच मर्यादित राहिल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे.
> जनतेचा थेट सवाल:
> * बंद असलेल्या पोलीस चौक्या तातडीने सुरू कधी होणार?
> * गल्लीबोळातील अवैध दारू, गांजा व सट्ट्याचे अड्डे उद्ध्वस्त करणार का?
> * शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका कधी होणार?



