गुन्हे

जळगावात मीरा-भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ४ किलो ९११ ग्रॅम MD जप्त

१ कोटी २२ लाखांचा अमली पदार्थ जप्त; दोघे ताब्यात, परजिल्ह्यातील पोलिसांच्या कारवाईने स्थानिक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

जळगाव मीडिया | प्रतिनिधी
जळगाव शहरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मीरा-भाईंदर पोलिसांनी तब्बल ४ किलो ९११ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे बाजारातील किंमत १ कोटी २२ लाख ७७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

मीरा-भाईंदर परिसरात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत पोलिसांचे पथक गुरुवारी जळगावात दाखल झाले होते. या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही उपस्थित होते.

पोलिसांनी प्रथम मेहरुण परिसरातील रामनगर येथून संशयित रहीम ताहीर पिंजारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथे कारवाई केली. यावेळी सय्यद मुशादूर अली मुमताज अली (२९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तब्बल ४ किलो ९११ ग्रॅम MD जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

परजिल्ह्यातील पोलिसांच्या कारवाईने स्थानिक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?

जळगाव शहरात यापूर्वीही MDसह विविध अमली पदार्थांची प्रकरणे समोर आली आहेत. काही प्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले होते. एका प्रकरणात उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याची पार्श्वभूमी आहे.

अशा परिस्थितीत आता मीरा-भाईंदर पोलिसांना जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात MDचा साठा असल्याची माहिती मिळते आणि कारवाईही केली जाते; मग स्थानिक पोलिसांना या साठ्याची माहिती का मिळाली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

स्थानिक पोलिसांकडून अधिकृत घोषवारा नाही

दरम्यान, जळगाव शहर पोलिसांनी या कारवाईची नोंद करण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या MDबाबत स्थानिक पोलिसांकडून स्वतंत्र अधिकृत घोषवारा अद्याप देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जळगाव शहरात कोणाच्या माध्यमातून आला? त्याचा पुरवठा नेमका कुठे होणार होता? या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे? तसेच स्थानिक पातळीवर या साठ्याची माहिती संबंधित यंत्रणेला का मिळाली नाही? असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाले आहेत.

ड्रग्ज नेटवर्कचे आणखी धागेदोरे उघड होणार?

मीरा-भाईंदर पोलिसांच्या तपासातून जळगावातील अमली पदार्थांच्या नेटवर्कचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात असून, MDचा पुरवठा करणारे तसेच त्याचे संभाव्य ग्राहक याबाबत तपास सुरू असल्याचे समजते.

जळगावातील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या कारवाईमुळे आता स्थानिक पोलिस यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहिले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button