गुन्हेजळगाव

मालमत्तेच्या वादातून भावजयीची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या दिराला जन्मठेप; २० हजारांचा दंड चिमुकल्याची

मालमत्तेच्या वादातून भावजयीची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या दिराला जन्मठेप; २० हजारांचा दंड

चिमुकल्याची प्रत्यक्षदर्शी साक्ष ठरली निर्णायक; जळगाव जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

दैनिक दिव्य मराठी / जळगाव : मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेल्या कौटुंबिक वादातून सख्ख्या भावजयीवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिपक लोटन सोनार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या खटल्यात मृत महिलेच्या अल्पवयीन मुलाची प्रत्यक्षदर्शी साक्ष आरोपीला गजाआड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरली.

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनी येथे राहणाऱ्या मृत योगिता मुकेश सोनार आणि त्यांचा दीर दिपक लोटन सोनार यांच्यात मालमत्तेच्या कागदपत्रांवरून गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. २१ मे २०२२ रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. हा वाद अचानक अत्यंत विकोपाला गेला आणि रागाच्या भरात दिपकने घरात असलेली कुऱ्हाड आणून योगिता यांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक प्राणघातक वार केले.

या भीषण हल्ल्यात योगिता सोनार गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी दिपक सोनार हत्यार घटनास्थळीच फेकून अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला होता. तात्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी या प्रकरणी कसून तपास करत आरोपीला अटक केली आणि न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले होते.

१७ साक्षीदार अन् तांत्रिक पुरावे ठरले महत्त्वाचे

हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयात चालला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयात भक्कम युक्तिवाद केला. त्यांनी आरोपीविरुद्ध एकूण १७ साक्षीदार तपासले. यामध्ये घटनेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. या चिमुकल्याने आपल्या डोळ्यांदेखत घडलेला हा थरार न्यायालयात जशाच्या तसा मांडला, ज्यामुळे आरोपीचा बचाव फोल ठरला.

त्याचप्रमाणे पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांची साक्ष व त्यांनी सादर केलेले न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) व तांत्रिक पुरावे न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे मानले.

न्यायालयाचा अंतिम निकाल

सरकारी पक्षाचा युक्तिवाद, चिमुकल्याची प्रत्यक्षदर्शी साक्ष आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी आरोपी दिपक लोटन सोनार याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२ (हत्या) अन्वये दोषी ठरवले. कौटुंबिक वादातून झालेल्या या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button