
ऑफिसर्स क्लबमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ५४ पिशव्यांचे रक्तसंकलन
प्रथमच रक्तदान करणाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
जळगाव,
ऑफिसर्स क्लब, जळगाव येथे मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५४ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले.
शिबिरात ऑफिसर्स क्लबचे अधिकारी व महिला सदस्य, समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीचे इंजिनिअरिंग कॉलेज, एनसीसी, एचडी फायर कंपनीचे अधिकारी तसेच रोटरी क्लब (मिड टाऊन) यांचे सदस्य सहभागी झाले होते.
भारत सरकार व भारतीय सशस्त्र सेना यांनी अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले होते.
या शिबिराच्या आयोजनासाठी रेड क्रॉस संस्था, ऑफिसर्स क्लबचे सदस्य व डॉक्टर्स यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, ज्या रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले, त्यांना रेड क्रॉसतर्फे सन्मानचिन्ह देण्यात आले, तसेच सर्व सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त तथा ऑफिसर्स क्लबचे सचिव श्री. योगेश पाटील यांनी दिली.