
१४ जूनपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम; तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
कृषी विभागाचा इशारा : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी
मुंबई (दि. ९ जून) : राज्यात यंदाच्या मान्सूनचे आगमन रखडले असून, १५ जूनपर्यंत मान्सूनची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १४ जूनपर्यंत राज्यात तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे.
कोणत्या भागात किती तापमान?
विदर्भात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज
मराठवाडा व खानदेशात कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास
पूर्व विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता
पश्चिम किनारपट्टी वगळता बहुतांश भागांत उष्णतेत वाढ
पावसाची स्थिती काय?
१४ जूनपर्यंत सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही
काही ठिकाणी, विशेषतः दक्षिण मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात,
दुपारी मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता
इतर भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आणि विखुरलेले असण्याचा अंदाज
कृषी विभागाचे आवाहन :
राज्यातील शेतकरी, विशेषतः कोरडवाहू शेती करणारे, मान्सून स्थिर होईपर्यंत पेरणी वा लागवड सुरू करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. उशीराचा मान्सून आणि उष्णतेची वाढती तीव्रता, यामुळे पेरण्या वाया जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.