
पावसाळ्यापूर्वी मनपा सतर्क; जळगावातील ११३ इमारती अतिधोकादायक, नोटिसांची कारवाई सुरू
जळगाव : पावसाळा तोंडावर आलेला असताना जळगाव शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींबाबत महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ११३ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले असून पावसाळ्यात या इमारती कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित इमारत मालकांना तातडीने नोटिसा बजावण्याची प्रक्रिया मनपाने युद्धपातळीवर सुरू केली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये सर्वाधिक ४६ इमारती धोकादायक आढळल्या आहेत. तर प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये ४१, प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये १३ आणि प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये १३ इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षीच्या सर्वेक्षणातही ११३ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे यंदा प्रशासन अधिक सतर्क झाले असून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
शहरातील बळीराम पेठ, नवी पेठ, विसनजी नगर, शिवाजीनगर, पोलन पेठ, निमखेडी गावठाण, पिंप्राळा शिवार, पिंप्राळा गावठाण, शनी पेठ, सराफ बाजार, बालाजी पेठ, दीक्षितवाडी, पांजरापोळ, जोशी पेठ आणि कोळी पेठ या भागांमध्ये धोकादायक इमारतींची संख्या अधिक असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे.
महानगरपालिकेकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २६५ (अ) अंतर्गत संबंधित मालकांना नोटिसा दिल्या जात आहेत. १९५० मधील कायदेशीर तरतुदीनुसार नोटीस बजावल्यानंतर संबंधित इमारत कोसळून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी इमारत मालक जबाबदार राहणार आहे. यामध्ये दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईची तरतूदही आहे.
धोकादायक इमारतींच्या मालकांमध्ये काही नगरसेवक, नामांकित चार्टर्ड अकाउंटंट तसेच मोठ्या व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. काही इमारती भाड्याने देण्यात आल्या असून काहींची विक्रीही करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी मालकी हक्क आणि न्यायालयीन वादामुळे कारवाईमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. एका प्रकरणात इमारत खाली करण्याच्या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले की, शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून संबंधित मालकांना तातडीने नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व कडक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.




