
तिरुपती बालाजीला एका भाविकांकडून सहा कोटींचे दान
नवी दिल्ली I वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला एका भाविकाने तब्बल ६ कोटींचे दान दिले. वर्धमान जैन असे या दानशूर भाविकाचे नाव असल्याची माहिती टीटीडीने रविवारी निवेदनातून जाहीर केली.
जैन यांनी टीटीडीद्वारा संचालित श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनलला (एसवीबीसी) ५ कोटींचे तर श्री वेंकटेश्वर गोसंरक्षण ट्रस्टला १ कोटीचे दान दिले. या रकमांचे डिमांड ड्राफ्ट त्यांनी मंदिराच्या रंगनायकुला मंडपम या सभागृहात पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.
एसवीबीसी हे टीटीडीचे भक्ती कार्यक्रमांचे प्रसारण करणारे दूरचित्रवाणी चॅनल आहे. तर एसवी गोसंरक्षण ट्रस्ट गायींची सुरक्षा व त्यांच्या अध्यात्मिक महत्त्वावर जोर देणारी संस्था आहे.