
अमळनेर, पारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
अमळनेर : पुणे येथे घडलेल्या मद्यप्रकरणाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर व पारोळा तालुक्यात अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. अमळनेर तालुक्यातील गांधली, नांदेड तसेच पारोळा तालुक्यातील चिखलोद व शेळावे परिसरातील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकले.
तसेच ताडीची वाहतूक करतानाही कारवाई केली. छाप्यात ६०६० लिटर रसायन, १९४ लिटर ताडी, १०० लिटर गावठी दारू तसेच एक दुचाकी असा एकूण ३ लाख ७६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. कारवाईनंतर संबंधित आरोपींना जागेवर सूचनापत्र देण्यात आले ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या वेळी चोपडा विभागाचे निरीक्षक कय्युम मोमीन, पारोळा विभागाचे निरीक्षक आर. के. फुसे, अमळनेर विभागाचे निरीक्षक गोपाल मोरे, जवान डी. एन. पाटील, शशिकांत पाटील व भूषण परदेशी उपस्थित होते. तपास दुय्यम निरीक्षक गोपाल मोरे करत आहेत.
तर, पारोळा तालुक्यातील चिखलो व शेळावे परिसरातील अवैध हातभट्टीवर तयार होणारी दारू अमळनेरातील पैलाड भागात पुरवली जात असल्याची गुप्त माहिती विभागाला प्राप्त झाली होती. त्याआधारे कारवाई करण्यात आली.


