गुन्हेजळगाव

पूर्ववैमनस्यातून माजी उपनगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; एरंडोलमधील तिघांना अटक, बोलेरो गाडी जप्त

पूर्ववैमनस्यातून माजी उपनगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; एरंडोलमधील तिघांना अटक, बोलेरो गाडी जप्त

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर १४ जून रोजी झालेला हल्ला हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघा आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य असल्याची कबुली मुख्य आरोपीने दिली आहे.

हल्ल्याच्या कटामागे राजकीय मतभेद

माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी एरंडोल पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, या हल्ल्यामागे राजकीय मतभेद असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी एरंडोलमधील एका पेट्रोल पंपावरील तब्बल ८ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली.

तिघांना अटक, हल्ल्याची कबुली

पोलिसांनी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (४०), शुभम कैलास महाजन (१९) आणि पवन कैलास महाजन (२०, सर्व रा. एरंडोल) यांना अटक केली. चौकशीदरम्यान या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मुख्य आरोपी उमेश याने दशरथ महाजन यांच्याशी असलेल्या पूर्वीच्या वादातून हा हल्ला केल्याचे कबूल केले आहे.

बोलेरो गाडी जप्त, आणखी आरोपींचा शोध सुरू

गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, या हल्ल्याच्या कटामागे इतर कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button