चीज अॅनालॉग वापराबाबत हॉटेल व्यावसायिकांना इशारा
ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक नियमभंग केल्यास होणार कठोर कारवाई

चीज अॅनालॉग वापराबाबत हॉटेल व्यावसायिकांना इशारा
ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक नियमभंग केल्यास होणार कठोर कारवाई
जळगाव | प्रतिनिधी — अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत नागरिकांना सुरक्षित, सकस व योग्य माहिती असलेले अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे बंधनकारक असून रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांनी “चीज अॅनालॉग” वापराबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पनीरऐवजी अॅनालॉग वापर; तक्रारींमध्ये वाढ
राज्यात काही ठिकाणी पनीरऐवजी “चीज अॅनालॉग”चा वापर करून अन्नपदार्थ तयार केले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक विक्रेते “चीज अॅनालॉग” किंवा “पनीर अॅनालॉग” हे पदार्थ “पनीर” किंवा “चीज” या नावाने विक्री करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नियमांनुसार स्पष्ट फरक आवश्यक
अन्न सुरक्षा व मानके (अन्नपदार्थ मानके व अन्न मिश्रित पदार्थ) विनियम, २०११ नुसार “पनीर” हा केवळ दुधापासून तयार होणारा पदार्थ आहे, तर “डेअरी अॅनालॉग” किंवा “चीज अॅनालॉग” हे इतर घटकांपासून तयार केले जातात. त्यामुळे या दोन्ही पदार्थांमध्ये स्पष्ट फरक असून त्याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.
मेनूकार्ड व बिलावर स्पष्ट उल्लेख आवश्यक
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच लेबलिंग व डिस्प्ले नियम, २०२० नुसार अन्नपदार्थ विक्री करताना त्यातील घटकांची माहिती देणे आवश्यक आहे. मेनूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड तसेच बिलावर “चीज अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नियमभंगास कठोर कारवाई
अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर केल्यास त्याची नोंद स्पष्टपणे करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच परवाना घेताना दिलेली माहिती अद्ययावत ठेवणेही आवश्यक आहे.
ग्राहकांनीही सतर्क राहावे
ग्राहकांनी पनीर खरेदी करताना लेबल तपासावे, संशय असल्यास बिल घ्यावे तसेच हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर व चीज अॅनालॉगमधील फरक लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“ग्राहकांनीही जागरूक राहून संशयास्पद बाबींची तक्रार त्वरित १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी.” — श्रीधर डुबे-पाटील, अन्न सुरक्षा आयुक्त



