
जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू; १२ जूनला आरक्षण सोडत
गावपातळीवरील राजकारण तापले; इच्छुकांकडून बैठका, संपर्क मोहिमा आणि रणनीतीला वेग
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुदत संपलेल्या तब्बल ७९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर विविध टप्प्यांमधून प्रक्रिया पूर्ण करून १० जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत जिल्ह्यातील गावकीच्या राजकारणात मोठी रंगत पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.
आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष
कोणते प्रभाग राखीव होणार, आरक्षणाची दिशा काय राहणार याकडे इच्छुक उमेदवार, स्थानिक गट आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये बैठका, संपर्क मोहिमा आणि राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागात निवडणुकांची चर्चा जोर धरू लागली आहे.
यावेळी निवडणूक प्रक्रियेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्क्यांपर्यंत जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. मात्र अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी यांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली असून त्यासाठी तयारीलाही सुरुवात झाली आहे.
आरक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे
• ८ जून : विशेष ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध
• १२ जून : विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत
• १९ जून : प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप जाहीर
• १९ ते २५ जून : हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत
• ३ जुलै : उपविभागीय अधिकाऱ्यांचा अंतिम अभिप्राय
• ८ जुलै : जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी
• १० जुलै : अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर



