
वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांना अटक
जळगाव : वाहनाचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कानळदा रोड परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज दिलीप आकोलकर (वय २८, रा. सत्यम नगर) हे ४ जुलै रोजी कानळदा रोड परिसरातून जात असताना त्यांच्या वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून काही जणांशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.
आरोपींनी सूरज आकोलकर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली तसेच कोयत्याने वार करून त्यांच्या डोक्याला, छातीला तसेच हात-पायांना दुखापत केली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सूरज आकोलकर यांनी ५ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आकाश अनिल पवार (२५), आदेश अनिल पवार (२५) आणि शाहीद अजमोद्दीन शेख (१९, सर्व रा. गेंदालाल मिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.




