जळगाव जनता सहकारी बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

जळगाव जनता सहकारी बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजी राजे नाट्य संकुल येथे रविवारी झालेल्या सभेत बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी ही घोषणा केली. यावेळी बँकेच्या एकूण व्यवसायात तब्बल २७५.९६ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष नितीन झवर, संचालक मंडळाचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सभेची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. यानंतर दिवंगत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नव्याने नियुक्त संचालक जवाहरभाई पटेल आणि डॉ. विलास रेलन यांचा सत्कार करण्यात आला.
ठेवी २,४३६ कोटींवर; कर्जवाटप १,४४९ कोटींवर
अध्यक्षीय भाषणात सतीश मदाने यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींमध्ये १८५.३८ कोटी रुपयांची वाढ होऊन त्या २,४३६.२८ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. कर्जवाटपात ९०.५८ कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली असून एकूण कर्जवाटप १,४४९.३९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत बँकेच्या एकत्रित व्यवसायात २७५.९६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
नेट एनपीए शून्य टक्क्यांवर
बँकेच्या आर्थिक शिस्तीचा उल्लेख करताना मदाने म्हणाले की, बँकेचा ग्रॉस एनपीए केवळ ३.३५ टक्के राखण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे नेट एनपीए शून्य टक्क्यांवर राखण्यात बँकेला यश मिळाले असून ही बँकेसाठी उल्लेखनीय उपलब्धी आहे.
डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल
उपाध्यक्ष नितीन झवर यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे बँकेची प्रगती, विविध योजना आणि डिजिटल बँकिंगमधील वाटचाल उलगडून सांगितली. हाताने लिहिल्या जाणाऱ्या नोंदींपासून सुरू झालेला प्रवास आज इंटरनेट बँकिंग आणि आधुनिक डिजिटल सेवांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेने इंटरनेट बँकिंग सेवा सुरू केली असून ग्राहकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असून बँकेला सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे.
बचतगट व ग्रामीण विकासावर भर
ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी ‘दुग्धसंपदा’ योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी २००० पासून सुरू करण्यात आलेला बचतगट विभाग प्रभावीपणे कार्यरत असून सध्या ३,६०० बचतगटांद्वारे सुमारे ६० हजार महिलांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचल्या आहेत.
लहान मुलांमध्ये बचतीची सवय रुजावी यासाठी ‘बालमित्र बचत खाते’ योजना सुरू करण्यात आली असून खाते उघडणाऱ्या मुलांना आकर्षक पिगी बँक दिली जाते.
सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल
बँक आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असून भविष्यात इतर राज्यांमध्ये शाखाविस्तार करण्याचे नियोजन आहे.
विद्यार्थ्यांसाठी दोन अभ्यासिका सुरू करण्याची योजनाही बँक राबविणार असल्याची माहिती सतीश मदाने यांनी दिली.
सायबर फसवणुकीचे वाढते धोके लक्षात घेऊन ग्राहकांसाठी डिजिटल साक्षरता अभियान राबविले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या सुरक्षित बँकिंग व्यवहार करता यावेत यासाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचाही बँकेचा मानस आहे.
सभेतील सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. विविध सभासदांनी मांडलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निराकरण करण्यात आले.




