
जळगाव मीडिया ( वसीम खान ) | आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तात जळगाव शहर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार अशरफ शेख यांनी कर्तव्यनिष्ठा, मानवता आणि सर्वधर्मसमभावाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.
वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असताना काही क्षण त्यांनी हातात टाळ घेत विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी होत भक्तीचा आनंद अनुभवला. मात्र, या भक्तिभावासोबतच त्यांनी आपल्या पोलीस कर्तव्यालाही तितकेच महत्त्व देत बंदोबस्ताची जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली.
अशरफ शेख यांच्या या कृतीमुळे उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि सर्वधर्मसमभावाचा सकारात्मक संदेश पोहोचला. धर्मापेक्षा माणुसकी आणि कर्तव्य मोठे असल्याचे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून सोशल मीडियावरही त्यांची चर्चा रंगली आहे.
सहायक फौजदार अशरफ शेख यांनी यापूर्वी जळगाव शहर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक उल्लेखनीय कामगिरी बजावल्या आहेत. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कार्यकाळात त्यांनी नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या उकलमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
पंढरपूरातील आषाढी वारीदरम्यान कर्तव्य आणि श्रद्धेचा सुंदर संगम घडवत सहायक फौजदार अशरफ शेख यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून मनापासून कौतुक होत आहे.



