सुप्रीम कॉलनीत अवैध धंद्यांचा पुन्हा जोर? नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

जळगाव मीडिया | प्रतिनिधी | एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनी परिसरात कथितपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बेकायदेशीर दारू विक्री, जुगार तसेच वरली-मटका सट्ट्याचे अड्डे सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून, यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ‘बाळू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून हे अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. या अड्ड्यांवर दिवसभर अनेक व्यक्तींची वर्दळ असल्याने रहिवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दारूच्या नशेत होणारे वाद, आरडाओरड, शिवीगाळ आणि अशोभनीय प्रकारांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिसरातून ये-जा करताना असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शाळा, महाविद्यालय तसेच कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना रोजच या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, या अवैध व्यवसायांबाबत कारवाई केवळ औपचारिक स्वरूपाची होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पोलिसांची गाडी आल्यानंतर काही काळासाठी अवैध धंदे बंद होतात, मात्र त्यानंतर पुन्हा पूर्ववत सुरू होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या प्रभावीपणाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, संबंधितांवर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील इतर भागांमध्ये अवैध धंद्यांविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात असताना सुप्रीम कॉलनीतील कथित अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई का होत नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिकांच्या मागणीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन विशेष पथकाद्वारे चौकशी करावी. संबंधित आरोपांची निष्पक्ष पडताळणी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच परिसरातील अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




