
‘ऑपरेशन ३/२५’ने जळगावात शस्त्रधारकांचे धाबे दणाणले! एकाच वेळी २१४ ठिकाणी ‘खाकी’ची धाड; ७ कट्टे, १९ काडतुसे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क | जळगाव स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त ठेवण्यासाठी पोलीस दलाने गुरुवारी भल्या पहाटे मोठे शक्तीप्रदर्शन केले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या ‘ऑपरेशन ३/२५’ या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील दहा वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांची ‘कुंडली’ काढून पोलिसांनी एकाच वेळी जिल्ह्यात तब्बल २१४ ठिकाणी दणकेबाज धाडी टाकल्या.

पहाटे ६ ची वेळ अन् गुन्हेगारांची तारांबळ गुन्हेगारांनी ही शस्त्रे स्वतःकडे न ठेवता मित्र किंवा नातेवाइकांकडे लपवली असण्याची दाट शक्यता होती. हीच बाब हेरून पोलिसांनी सर्व संबंधित ठिकाणी पहाटे ६ वाजता एकाच वेळी धडक दिली. या अचानक झालेल्या कारवाईने संशयितांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त या मोहिमेत ७ गावठी कट्टे, १९ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ चाकू, २५ मोबाईल आणि ३ मोटारसायकली असा एकूण ७ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. भुसावळात गोजऱ्या जाधव, एमआयडीसीत रोशन पाटील, तर एलसीबीच्या कारवाईत राजकिरण परदेशी व रईस तांबोळी यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चाळीसगावात प्रथमेश भामरे आणि जयेश राजपूत यांच्याकडून २ कट्टे, ६ काडतुसे व तलवार हस्तगत करण्यात आली. तसेच दीपक मरसाळे याच्याकडून तब्बल २५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अशोक नखाते व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.




