
रोहित्र बिघाड, थकबाकी आणि वीजचोरीकडे दुर्लक्ष; महावितरणचे अधीक्षक अभियंता निलंबित
जळगाव मंडलातील कामकाजावर ठपका; ६७ कोटींची वीजबिल थकबाकी
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव मंडलातील वीज वितरण व्यवस्थेतील अनियमितता आणि अपेक्षित कारवाई न केल्याचा ठपका ठेवत महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी १९ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला.
चोपडा शहरातील उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण ४.२० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्ष प्रमाण १०.२६ टक्क्यांवर पोहोचले.
जुलै २०२६ अखेर जळगाव मंडलात तब्बल ६७ कोटी १४ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी होती. त्याचबरोबर तपासात ३ हजार १६४ वीजचोरीची प्रकरणे समोर आली. त्यापैकी २ हजार १६९ प्रकरणांत अपेक्षित दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचेही आदेशात नमूद आहे.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना मुख्यालय सोडता येणार नसून नाशिक येथील मुख्य अभियंता कार्यालयात आठवड्यातून दोन वेळा उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.




