गुन्हेजळगाव

शाहूनगरातील चोरीचा पाच तासांत पर्दाफाश; तिघे ताब्यात

शाहूनगरातील चोरीचा पाच तासांत पर्दाफाश; तिघे ताब्यात

पँटच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास; १२ हजार रुपये हस्तगत

जळगाव : शाहूनगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात पँटच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या तिघांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. संशयितांकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

२६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या सुमारास शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात अनिल राजमल कासट (वय ६२, रा. एमआयडीसी, म्हाडा कॉलनी, जळगाव) यांच्या पँटच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी १२ हजार ५०० रुपये लंपास केले होते. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयितांचा माग काढला. तपासात शहीदखान नजीरखान (वय २७), समीर खान मजीदखान (वय ३७) आणि एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाचा चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरात शोधमोहीम राबवून तिघांना एका दुकानाजवळून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी चोरीचा छडा लावल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय सुनील पाटील, सफौ दीपक शिरसाट, पोहेकॉ नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणव पवार आणि भगवान मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button