जळगावराजकारण

जिल्हा बँकेसाठी नेत्यांची ‘फिल्डिंग’; मंत्री-आमदारांसह कुटुंबीयांचेही ठराव!

शेतकऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग; पत्नी, मुलांसह माजी पदाधिकाऱ्यांचीही नावे चर्चेत

जळगाव मीडिया ( वसीम खान ) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच विविध गटांकडून ‘फिल्डिंग’ लावली जात असून, जिल्ह्यातील दिग्गज मंत्री, आमदार आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांकडून ठराव दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, काही नेत्यांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता पत्नी, मुलगा, मुलगी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावानेही ठराव दाखल केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय घराण्यांचा प्रभाव किती राहणार, याची चर्चा सहकार क्षेत्रात रंगली आहे.
दिग्गज मंत्री-आमदारांच्या नावांची चर्चा
उपलब्ध माहितीनुसार, पालकमंत्री गुलाबराव पाटील – खेडी (ता. जळगाव), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन – हिवरखेडा (ता. जामनेर), केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – कोथळी (ता. मुक्ताईनगर) यांच्यासह मंगेश चव्हाण – हिंगोणे (ता. चाळीसगाव), किशोर पाटील – अंतुर्ली (ता. पाचोरा), अनिल पाटील – अमळगाव व वासरे (ता. अमळनेर) आणि प्रा. चंद्रकांत सोनवणे – मेहरुण (जळगाव) यांच्या नावाने ठराव झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणता राजकीय गट किती ताकदीनिशी मैदानात उतरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्नी-मुलांच्याही नावाने ठराव
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे नेत्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने दाखल झालेले ठराव.
मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या नावाने ठराव दाखल झाल्याचे वृत्त आहे.
आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे, आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील आणि आई नलिनी पाटील यांच्या नावांचाही ठरावांमध्ये समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
माजी मंत्र्यांच्या कुटुंबीयांचीही एंट्री
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे स्वतःचे दोन ठराव असून, त्यांचे पुत्र विशाल देवकर आणि सून यांच्याही नावाने ठराव दाखल झाल्याची माहिती आहे.
याशिवाय विद्यमान चेअरमन संजय पवार आणि त्यांच्या पत्नी सोनल पवार यांचेही ठराव असल्याचे वृत्त आहे.
माजी खासदार उमेश पाटील, माजी चेअरमन अॅड. रोहिणी खडसे, विकास पवार, अॅड. रवींद्र पाटील, माजी उपमहापौर सुनील महाजन, कुलभूषण पाटील आणि रोहित निकम यांच्याही नावाने ठराव दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘शेतकऱ्यांची बँक’ की ‘नेत्यांची बँक’?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आर्थिक संस्था मानली जाते. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे.
मात्र, निवडणुकीपूर्वीच मंत्री, आमदार, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे ठरावांच्या माध्यमातून पुढे येत असल्याने “शेतकऱ्यांची बँक, पण सुभेदारी नेत्यांचीच?” असा सवाल आता चर्चेत आला आहे.
ठरावांनंतर पुढचे चित्र काय?
सध्या ठरावांच्या माध्यमातून प्रत्येक गट आपली ताकद आजमावत आहे. आगामी काळात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कोण कोणाच्या विरोधात मैदानात उतरतो, कोणत्या गटाला किती संस्थांचा पाठिंबा मिळतो आणि अंतिम राजकीय समीकरण काय आकार घेते, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हाती जाणार? यासाठी आता सहकार क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आगामी निवडणूक प्रक्रियेकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button