गुन्हेजळगावसामाजिक

जळगावातील बी. जे. मार्केटमध्ये कोयत्याचा थरार! जुन्या वादातून चिकन विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

जळगावातील बी. जे. मार्केटमध्ये कोयत्याचा थरार! जुन्या वादातून चिकन विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

​डोक्यावर अन् चेहऱ्यावर सपासप वार; मध्यस्थी करणाऱ्या मुलगा व पुतण्यालाही लाकडी दांडक्याने झोडपले, संशयित फरार!

जळगाव मीडिया प्रतिनिधी
शहरातील अत्यंत गजबजलेल्या बी. जे. मार्केट परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका चिकन विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा रक्ताळलेला थरार घडला.

या घटनेत गोपाल मधुकर चौधरी (रा. कासमवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या सुनील रसाळ राठोड (रा. कांचन नगर) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गोपाल चौधरी यांची बी. जे. मार्केट परिसरात चिकनची हातगाडी आहे. यापूर्वी संशयित आरोपी सुनील राठोड आणि गोपाल चौधरी यांच्यात जुना वाद झाला होता, ज्याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या जुन्या केसचा राग मनात धरून रविवारी रात्री नेहमीप्रमाणे गाडीवर असलेल्या गोपाल चौधरी यांच्याजवळ सुनील राठोड हा हातात धारदार कोयता आणि लाकडी दांडुका घेऊन आला. “तुला आज जिवंत सोडणार नाही,

आज तुझा काटाच काढतो,” असे ओरडत त्याने थेट चौधरी यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने गंभीर वार केले. या हल्ल्यात चौधरी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा व पुतण्या धावून आले असता, आरोपीने त्यांनाही दांडक्याने मारहाण केली आणि दुचाकीवरून पसार झाला.

गंभीर जखमी चौधरी यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी जखमींचे पुतणे सचिन चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर, कैलास शिंदे व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button