गुन्हेजळगावसामाजिक

देवगिरी बँक फसवणूकप्रकरणी जिनिंग कंपनीच्या संचालकाला अटक

देवगिरी बँक फसवणूकप्रकरणी जिनिंग कंपनीच्या संचालकाला अटक

५.३३ कोटींची गहाण मशिनरी परस्पर विकल्याचा आरोप; चार दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : रांजणगाव (ता. चाळीसगाव) येथील मे. उमंग व्हाइट गोल्ड प्रा. लि. या जिनिंग कंपनीने उद्योग उभारणीसाठी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात गहाण ठेवलेली मशिनरी परस्पर विकून देवगिरी नागरी सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे संचालक प्रशांत राजेंद्र वाघ (रा. चाळीसगाव) यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मे. उमंग व्हाइट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या चार संचालकांनी देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतून उद्योगासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या मोबदल्यात कंपनीची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची मशिनरी बँकेकडे गहाण ठेवण्यात आली होती. मात्र, बँकेची पूर्वपरवानगी न घेता संबंधित मशिनरीची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे बँकेची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रशांत वाघ यांच्यासह उन्मेष पाटील, संजय धनकवडे आणि प्रमोद जाधव (दोघे रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणातील रक्कम मोठी आणि गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने तपास जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यामध्ये प्रशांत वाघ वगळता इतर तिघांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे प्रशांत वाघ यांच्या अटकेची शक्यता कायम होती.

प्रशांत वाघ हे चाळीसगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने बुधवारी त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button