गुन्हेजळगाव

७०० रुपयांची लाच मागितली, २०० रुपयांवर सौदा; भूकरमापक पुन्हा एसीबीच्या जाळ्यात

७०० रुपयांची लाच मागितली, २०० रुपयांवर सौदा; भूकरमापक पुन्हा एसीबीच्या जाळ्यात

जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात कारवाई; २०१२ नंतर १४ वर्षांनी पुन्हा लाचखोरी

जळगाव : शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांची लाच मागणाऱ्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला २०० रुपये स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
भगवान रोहिदास गायकवाड (५१, रा. भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या भूकरमापकाचे नाव आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्याविरुद्ध यापूर्वीही लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा लाच घेताना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

शेतकऱ्याने एसीबीकडे केली तक्रार
नेरी बुद्रूक येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याला आपल्या शेतीची मोजणी करायची होती. त्यासाठी आवश्यक स्कीम पत्रक आणि टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती मिळविण्यासाठी त्यांनी २ सप्टेंबरला जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.
कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी गायकवाड यांनी ७०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.

पडताळणीनंतर सापळा
तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी गायकवाड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोड होऊन २०० रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने २०० रुपये देताच एसीबी पथकाने गायकवाड यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

२०१२ मध्येही कारवाई
भगवान गायकवाड यांच्याविरुद्ध २०१२ मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तब्बल १४ वर्षांनी पुन्हा त्यांच्यावर लाचखोरीच्या आरोपात कारवाई झाल्याने भूमिअभिलेख कार्यालयातील कारभार चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button