
टेंडर मिळवून देण्याच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक
सिमेंट कंपनीत वाहने लावणाऱ्या व्यावसायिकाला दोघांनी घातला गंडा; नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : विविध कंपन्यांचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून रामेश्वर कॉलनीतील मिलिंद विलास मंडाडुळे (वय ४६) यांची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रवीण भास्कर भामरे (वय ६०, रा. नशिराबाद, ह.मु. धुळे) आणि आशितोष प्रवीण भामरे या दोघांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंडरचे आमिष दाखवून घेतले पैसे
मिलिंद मंडाडुळे यांची मालवाहतूक करणारी वाहने नशिराबाद येथील एका सिमेंट कंपनीत लावलेली आहेत. या ठिकाणी त्यांची प्रवीण भामरे आणि आशितोष भामरे यांच्याशी ओळख झाली. भामरे यांनी साखर व कांदा प्रक्रिया उद्योगातील कंपन्यांशी आपला परिचय असून, विविध कंपन्यांचे टेंडर मिळवून देऊ शकतो, असे मंडाडुळे यांना सांगितले. या आमिषातून दोघांनी वेळोवेळी रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण १८ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चौकशीअंती फसवणूक उघड
टेंडर मिळत नसल्याने आणि दिलेले पैसे परत मिळत नसल्याने मंडाडुळे यांनी संबंधित सिमेंट कंपनीत जाऊन चौकशी केली. त्यावेळी प्रवीण भामरे यांचे कंपनीत कोणतेही टेंडर नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंडाडुळे यांनी पोलिसांत धाव घेतली.
१५ जानेवारी २०२५ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मिलिंद मंडाडुळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.



