जळगावराजकारणसामाजिक

जळगाव महापालिकेत महायुतीचा ‘बिनविरोध’ श्रीगणेशा

जळगाव महापालिकेत महायुतीचा ‘बिनविरोध’ श्रीगणेशा
भाजप सेनेचे प्रत्येकी सहा उमेदवार बिनविरोध, आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवारांमध्ये रणसंग्राम ! 

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय समिकरणे पूर्णतः बदलली आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या शिष्टाईला मोठे यश आले असून, दोन दिवसांत तब्बल ३१७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. या घडामोडींमुळे ७५ पैकी १२ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून, आता उर्वरित ६३ जागांसाठी ३२१ उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष लढत होणार आहे.

महायुतीचा विजयाचा धडाका

अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर महायुतीने निवडणुकीत दमदार आघाडी घेतली आहे. बिनविरोध झालेल्या १२ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ६ आणि शिवसेनेने ६ जागांवर विजय मिळवून निवडणुकीपूर्वीच विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भाजपच्या उज्वला बेंडाळे (प्रभाग १२ ब) यांनी या बिनविरोध विजयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर शिवसेनेचे मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख आणि डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड गुरुवारीच निश्चित झाली होती.

अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

शुक्रवार, २ जानेवारी रोजी माघारीच्या अंतिम दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या सरला सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या रेखा पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. दुपारी आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे (प्रभाग ७ क) यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. याच प्रभागातून (७ अ) शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री हिवराळे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या दीपमाला काळे याही बिनविरोध निवडून आल्या आहेत.

​याशिवाय भाजपचे डॉ. विश्वनाथ खडके (१६ अ), वैशाली पाटील (१३ क), अंकिता पाटील (७ ब) आणि शिवसेनेचे सागर सोनवणे (२ अ) व गणेश उर्फ विक्रम सोनवणे (१९ ब) यांनीही बिनविरोध विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

आता ‘मैदान’ सज्ज

एकूण १०३८ अर्जांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ३२१ उमेदवारांवर येऊन थांबला आहे. ३०१ अपक्ष उमेदवारांसह उद्धवसेना, राष्ट्रवादी आणि इतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने आता खऱ्या अर्थाने लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. मनसेचे अविनाश पाटील आणि प्रहारचे योगेश कदम यांनीही अखेरच्या क्षणी माघार घेतली. महायुतीच्या या सुरुवातीच्या यशामुळे समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह असून, आता उर्वरित ६३ जागांसाठी होणाऱ्या चुरशीच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button