
विद्यार्थ्यांसाठी दिलासा; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २०० क्षमतेचे नवे वसतिगृह उभारणार
२३ कोटींच्या प्रकल्पाला व्यवस्थापन परिषदेची मंजुरी; जनसहभागातून निधी उभारणीचा निर्णय
जळगाव | प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रवेशसंख्येच्या पार्श्वभूमीवर २०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवे वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ मे २०२६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या वसतिगृहासाठी अंदाजे २३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
विद्यापीठात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांतील आदिवासी तसेच ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असतात. सध्या उपलब्ध असलेल्या तीन वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांची निवासाची गरज पूर्ण होत नसल्याने नव्या वसतिगृहाची आवश्यकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ निधीसोबतच जनसहभागातूनही निधी उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
व्यवस्थापन परिषद सदस्यांची देणगी जाहीर
या उपक्रमासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे, नितीन झाल्टे आणि ॲड. अमोल पाटील यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांनी किमान २५ हजार रुपयांपासून आर्थिक योगदान देण्याची तयारी दर्शवली.
देणगीदारांसाठी विशेष योजना
वसतिगृह प्रकल्पासाठी देणगी देणाऱ्यांच्या नावाने विविध सुविधा उभारण्यात येणार असून त्यासाठी देणगीची स्वतंत्र रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अद्ययावत स्वयंपाकघर आणि भोजनगृहासाठी एक कोटी रुपये, निवासी इमारतीच्या प्रत्येक मजल्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये, नवसंशोधन व संगणक प्रयोगशाळेसाठी ५० लाख रुपये, २४ तास सुविधा असलेल्या ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी ५० लाख रुपये, सामायिक विश्रामकक्ष व अंतर्गत जिमखान्यासाठी २५ लाख रुपये तर एका निवास खोलीसाठी ५ लाख रुपयांची देणगी निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय, एक लाख रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्यांसाठी ‘वॉल ऑफ ऑनर्स’ तयार करण्यात येणार असून संबंधित देणगीदारांची नावे त्या त्या ठिकाणी दर्शविली जाणार आहेत.
सीएसआर व समाजातील दानशूरांना आवाहन
या प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या देणगीवर आयकर कलम ८०जी अंतर्गत सवलत मिळणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. विविध उद्योगसमूहांनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी या कार्यासाठी पुढाकार घेत आर्थिक मदत करावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.




