
मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवींचे चांदीचे मुकुट, छत्र्या लंपास
१ लाख ३५ हजारांचा १ किलो चांदीचा ऐवज चोरीला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल
यावल (जि. जळगाव) : सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मनूदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून देवींच्या मूर्तीवरील सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा १ किलो चांदीचा ऐवज लंपास केला. मनूदेवी व रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट आणि छत्र्या चोरीला गेल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश
६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मंदिर नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला.
चार चांदीच्या वस्तू लांबवल्या
चोरट्याने मनूदेवी मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत ४० हजार ५०० रुपये) आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री (किंमत २७ हजार रुपये) चोरून नेली. तसेच रेणुका मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत ४० हजार ५०० रुपये) आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री (किंमत २७ हजार रुपये) असा एकूण १ किलो वजनाचा आणि १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला.
सकाळी चोरीचा प्रकार उघड
७ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी व सेवक मंदिरात आले असता दरवाजाचे कुलूप व कडी-कोंडा तुटलेला दिसला. गाभाऱ्यातील चांदीचा ऐवज गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
या प्रकरणी आडगाव येथील शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीचा तपास सुरू असून चोरट्याचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.




