मनपाचा खान्देश महोत्सव आजपासून रंगणार
जळगाव : महिला बचत गटांसह इतर उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच खान्देशच्या स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आणि या भूमीला लाभलेल्या इतर प्रकारच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी एक खात्रीशीर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जळगाव महापालिकेतर्फे आज दि. ३ ते ७ जानेवारी या कालावधीत ‘खान्देश महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक . माहेश्वर रेड्डी इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांची सिलेब्रेटी म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे.
बॅरिस्टर निकम चौक, सागर पार्क याठिकाणी स.१० ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात, महिला बचत गटांच्या उत्पादनांपासून ते नामांकित ब्रँड्सच्या उत्पादनांपर्यंतचे स्टॉल्स असतील, आगामी गुलाबी थंडीच्या दृष्टीने विंटर झोन, फॅशन झोन, पर्यावरणपूरक लाईफ स्टाईलसाठी ‘माझी वसुंधरा’ विभाग असे विविध रंजक विभाग असतील, बच्चे कंपनीला मज्जा करण्यासाठी आकर्षक किड्स झोन, आणि खवय्यांसाठी विविध पदार्थांची खाद्यजत्राही भरणार आहे. एकंदरीत बालगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच्या असंख्य बाबींची या महोत्सवात रेलचेल असणार आहे. इतरांना प्रेरणा देण्यासाठी, अनेकांच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी, सामाजिक दायित्वाच्या संवेदनेतून यात सहभागी व्हावे, सहकुटुंब सहपरिवार खान्देश महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे व अधिकारी- कर्मचारी वृंदाच्या वतीने करण्यात आले आहे.