
धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी परिसरातील धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा संतोष गायकवाड (वय २३, रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
धबधब्याच्या पाण्यात बुडाल्याची माहिती
पाटणादेवी मंदिराच्या पाठीमागील धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वनपाल कैलास चव्हाण व राजाराम चव्हाण (रा. पाटणादेवी) यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केली.
पोलिसांसह वन विभागाची मदतकार्य
ग्रामीण सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण संगिले, अकरम बेग, पोलिस नाईक भगवान माळी, दत्ताराम पवार तसेच पाटणादेवीचे पोलिस पाटील अमोल चौधरी यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.
या घटनेप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. धवलतीर्थ धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




