
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जलसंधारणाला लोकचळवळ करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगावकरांना आवाहन
जळगाव: “पाण्याचा प्रश्न उद्याचा नसून आजचाच आहे. पाऊस किती पडेल हे आपल्या हातात नसले, तरी पडणारे पाणी अडवून जमिनीत जिरवणे आपल्या हातात आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण ही केवळ सरकारी योजना न राहता, ती एक व्यापक ‘लोकचळवळ’ बनली पाहिजे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जलसंधारण दिनानिमित्त जळगाव येथील सागर पार्क येथून आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या वॉकेथॉनला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, जलसंपदा अधीक्षक अभियंता संतोष भोसले, तसेच विविध अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित सर्व नागरिकांना पाणी बचत व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते विविध क्रमांकांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले, सूत्रसंचालन संदीप केदार यांनी, तर आभार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश पारधी यांनी मानले.




