जळगाव

उज्जैनला दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; एमआयडीसी पोलिसांनी 24 तासांत शोधून ३१ लाखांचे सोने जप्त

रामेश्वर कॉलनीतील घटना; सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणावरून दोन संशयित भावांना अटक

उज्जैनला दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; एमआयडीसी पोलिसांनी 24 तासांत शोधून ३१ लाखांचे सोने जप्त

रामेश्वर कॉलनीतील घटना; सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणावरून दोन संशयित भावांना अटक

जळगाव:एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनीत घडलेल्या ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांच्या घरफोडीचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत दोन संशयितांना जेरबंद केले आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्व २०८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २८ ग्रॅम चांदी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशाल मुरलीधर दाभाडे व जितेंद्र मुरलीधर दाभाडे (दोघे रा. रामेश्वर कॉलनी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते दोघे सख्खे भाऊ आहेत.

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी संगीता घुगे या कुटुंबियांसह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेल्या असता, २७ ते २८ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. घुगे कुटुंबीय परत आल्यानंतर घरफोडी उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विशाल दाभाडे आणि जितेंद्र दाभाडे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. जप्त मुद्देमालात सोन्याचे गंठन, पाटल्या, अंगठ्या, टॉप्स, नथ व चांदीच्या जोडव्यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही अत्यंत यशस्वी कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button