
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन
जळगाव जिल्हा बँकेत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण; पाडळसरे धरणाला अजितदादांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अजितदादांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत, सिंचन क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित केले.
कांताई बंधाऱ्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला
अशोक जैन म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील कांताई बंधारा उभारण्यात अजितदादांची मोलाची भूमिका होती. त्यांच्या सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टीमुळे कांताई बंधाऱ्याच्या परिसरासह मागील सात ते आठ किलोमीटर अंतरावरील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली. शेती बागायती झाली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले.
जैन हिल्स येथील कृषी संशोधन आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या संशोधनाविषयी अजितदादांना विशेष आस्था होती. ते या संशोधनाचा आवर्जून अभ्यास करत आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असत. सहकार, राजकारण, उद्योग किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. हीच कार्यपद्धती शरद पवार यांच्यामध्येही दिसून येते. पवार साहेबांचा वारसा अजितदादांच्या कामाच्या पद्धतीतूनही अनुभवायला मिळाला. अजितदादांसारखे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात होणे नाही, अशा शब्दांत अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाडळसरे धरणाला अजित पवारांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार – गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अजितदादा व्यक्ती म्हणून स्पष्टवक्ते होते. जिल्हा बँकेत त्यांचा देखणा पुतळा उभारण्यात आल्याने सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यांच्या विचारांतूनच बँकेला प्रगतीपथावर न्यावे लागेल.
जळगाव आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाडळसरे धरण गेल्या २९ वर्षांपासून प्रलंबित आहे. नुकतीच या धरणाला चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, केंद्र सरकारच्या विविध सिंचन योजनांतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाडळसरे धरण पूर्णत्वास नेण्यासाठी अजितदादांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांच्या कार्यामुळेच या कामाला गती मिळाली आहे.
त्यामुळे संपूर्ण जिल्हावासीयांच्या वतीने पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तसेच विधानसभा व विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहांत पाडळसरे धरणाला अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी समारोपीय मनोगतात सांगितले.
महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी क्षण – बाबासाहेब पाटील
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजितदादांच्या नेतृत्वाचा गौरव करताना सांगितले की, स्वच्छता, शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर संघर्षातही यश मिळवता येते, हे त्यांच्या नेतृत्वाने दाखवून दिले. जिल्हा बँकेनेही याच विचारातून कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
जळगावातील जैन उद्योग समूहाच्या शेती व जलक्षेत्रातील कार्याचे कौतुक करत, शेती आणि पाण्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या भूमीत सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय कार्याची सुरुवात करणाऱ्या अजितदादांच्या पुतळ्याचे जिल्हा सहकारी बँकेत लोकार्पण होणे हा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या कार्याच्या आठवणींना मान्यवरांकडून उजाळा
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी प्रास्ताविकात अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याविषयी माहिती दिली. आमदार अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. अजितदादा हे आपल्या कामातून लोकनेते ठरल्याचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी सांगितले.
दुष्काळासारख्या परिस्थितीत अजितदादांनी घेतलेले कठोर, पण लोकहिताचे आर्थिक शिस्तीचे निर्णय आणि प्रशासनावरील त्यांची पकड वाखाणण्याजोगी होती, असे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे म्हणाले. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणारे काम अजितदादांनी केल्याचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. कार्यमग्नता हेच जीवन मानणारा नेता म्हणजे अजितदादा, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.
पुतळा कसा आहे, यापेक्षा त्या व्यक्तीचे विचार किती प्रेरणा देतात, हे महत्त्वाचे आहे. अजितदादा हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. तर पुढील पिढीसाठी शिस्तप्रिय नेत्याचा ठेवा म्हणजे अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी नमूद केले.
शिल्पकारांचा सत्कार; जीवनचरित्र ग्रंथाचे प्रकाशन
कार्यक्रमाला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, महापौर दीपमाला काळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शरद पाटील, अॅड. रविंद्रभैय्या पाटील, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदीप देशमुख, रोहित निकम, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संचालक जनाबाई महाजन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, डी. के. पाटील, डी. जी. पाटील, राजीव पाटील, डॉ. सुरेश शामराव पाटील, प्रशांत चौधरी, शामकांत सनेर, तिलोत्तमा पाटील, प्रमोद पाटील आणि दीपक सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याची निर्मिती करणारे शिल्पकार श्रेयस गर्गे आणि मिलिंद गर्गे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामगौरवच्या वतीने अजितदादांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. गुलाबराव देवकर यांनी आभार मानले, तर हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



